Gandhi and Religion

।। गांधीजींची धर्मभावना ।।
™™™™™™™™™™™™™™™

गांधीजी ही व्यक्ती मुळातच धार्मिक होती व ते निश्चितपणे स्वतःला हिंदू म्हणायचे. या अर्थाने त्यांनी कितीतरी प्रमुख धर्माच्या धर्मप्रसारकांना त्यांच्या धर्मात , धर्मांतर करण्यासाठीच्या प्रयत्नात व्यक्तिगत पणे नम्र पण स्पष्ट नकार दिला होता .अशी ठळक-ठळक उदाहरणे आहेत .
गांधीजींच्या धर्म संकल्पनेत नीती व नीतियुक्त आचरणास फार-फार मोठे स्थान आहे . ते म्हणत की धर्म आणि नीती जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . नीति शिवाय धर्माचे अस्तित्व असू शकत नाही आणि धर्माशिवाय नीती-विकास ; महा कठीण.
गांधीजींनी ‘धर्म नीती’ असे एक पुस्तकच दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध केले.भारतामध्ये त्यांचे यावरील विचारांच्या संकलनाचे ‘नीतिधर्म’ हेही एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते.
गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे. पण त्यांचा ‘सनातन’ याचा अर्थ आपल्या समजूती प्रमाणे नव्हता . आपल्याला तो सनातनी ब्राह्मण’ या वाक्प्रचारात जो बहुदा अर्थ दिसतो तो फार वेगळा व चुकीचा असतो.
खरे तर सनातन याचा dictionary meaning ‘शाश्वत’ , ‘चिरंतन’ असा आहे. जी मूल्ये चिरंतन आहेत , शाश्वत आहेत ज्यांना काळसुद्धा किंचितही धक्का लावू शकणार नाही अशी मूल्ये म्हणजे सनातन मूल्ये . हिंदु धर्मातील अशाच मूल्यांचे आणि तत्त्वांचे गांधीजी खंदे पुरस्कर्ते होते.

ती अशी मूल्य म्हणजे अहिंसा , सत्य , अपरिग्रह म्हणजे किमान वस्तू धारण(posses) करणे , अस्तेय (चोरी मनानेसुद्धा न करणे), ब्रह्मचर्य, अभय(ईश्वराशिवाय कोणालाही न भिणे), आणि याही शिवाय त्यांनी खासकरून अजून भर दिला ते म्हणजे शरीर-श्रम , अस्वाद , सर्वधर्मसमभाव , स्वदेशी , अस्पृश्यतानिवारण ही ती सनातन मूल्ये आहेत . (एकादश व्रते ; पुस्तक-मंगलप्रभात).

त्यात “स्वदेशी”( म्हणजे जीवनात दैनंदिन गरजांसाठी “स्थानिक-घरगुती-कॉटेज-ग्रामीण” उत्पादनांचाच आग्रहाने उपयोग करणे.) हे एक पुरातन सत्य व मूल्य आहे. तरीपण जणू काही गांधीजींचे ओरिजनल क्रिएशन वाटावे ! आपल्यासाठी असली ती बाब आहे! “स्वदेशी-आचरणा”चे धर्मातील महत्व दाखवण्याचा त्यांनी जीवनभर कसोशीने प्रयत्न केला .

कालप्रवाहाच्या वाटचालीदरम्यान हिंदू धर्मामध्ये घुसून स्थान मिळवलेल्या अनेक हीन दर्जाच्या बाबींना गांधीजी जाहीरपणे पायदळी तुडवत. उदाहरणार्थ उच्चनीचभाव , स्पृश्यास्पृश्य भाव , ऐषाराम , सोयीसुविधांची लालसा , स्त्रियांना केवळ भोग्य वस्तू म्हणून दिली जाणारी कनिष्ठ दर्जाची वागणूक , व्यसनाधिनता , सतीप्रथा , बालविवाह , विधवा स्त्रियांचा छळ , असे कितीतरी सांगता येतील. गांधीजी हे सर्व फक्त बोलून दाखवत नव्हते तर त्यांनी यातील जवळजवळ प्रत्येक बाबीवर त्यांच्या आपल्या पद्धतीने प्रचंड चळवळी , मोहिमा , जाहीर आचरणाची उदाहरणे – यामार्फत ते समाज जागा करत होते. यासाठी त्यांनी कितीतरी अहंकारी पाखंडी धर्ममार्तंडांचा रोष व दुश्मनी ओढवून घेतली होती. या मंडळींनी अशाच कारणामुळे याआधीसुद्धा त्यांच्या खुनाचे प्रयत्न केले होते. व ती दुश्मनी आजतागायत ही चालू आहेच . अहंकारी ब्राह्मणांच्या संदर्भाने तर ते बोलत असत कि ज्याच्या मनाला “उच्च”ते चा भाव स्पर्श जरी झाला तरी तो पायदळी तुडवण्याचे लायकीचा झाला .!

मात्र गांधीजी नेहमी म्हणायचे की ही सर्व sanatan काळासाठी टिकणारी तत्त्वे , मी सांगतोय असे अजिबात नव्हे.
ही तत्त्वे आमच्या दृष्ट्या पूर्वसूरींनी शोधली व विकसितही केली. ही सर्व तत्त्वे शाश्वत आहेत , सनातन आहेत व ती “As old as hills” आहेत . असे ते ठळकपणे म्हणायचे .
आणि निश्चितपणे याच अर्थाने ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे.

गांधीजी असेही म्हणायचे की सत्य , अहिंसा , अपरिग्रह , ब्रह्मचर्य, अस्तेय या शाश्‍वत मूल्यांवर हिंदू धर्मात हिंदू समाजात जेवढे-जेवढे व्यापक आणि प्रदीर्घ प्रयोग आणि प्रयत्न झाले तेवढे इतर कोणत्याच धर्मात झाले नसतील .

हिंदू धर्माच्या प्रांगणात त्याही काळी अनेक ढोंगी स्वार्थी आणि भोंदू धर्ममार्तंड होतेच. त्यांनी स्वतःला सनातनी नाव आधीपासूनच चिकटवून घेतले होते. ते भरपूर गवगवा करत असायचे .
आणि म्हणूनच सनातनी म्हटले की आपल्या डोक्यात तशा प्रकारचे कर्मठ , ढोंगी “सनातनी ब्राम्हण” असा चुकीचा अर्थ बसला आहे. हा चुकीचा अर्थ शंभर वर्षाच्या आधीच्या काळातील अनेक साहित्यिकांनीही बसवून दिला आहे. म्हणून आपण सनातनी या शब्दाबद्दल गैरसमजात आहोत .

हिंदू धर्माने म्हणजे भारतीय भूमीने , भारतीय उपखंडातील समाजाने ; अहिंसा, सत्य , अस्तेय , ब्रह्मचर्य , अपरिग्रह अशा सनातन मूल्यांवर प्रदीर्घ आणि व्यापक प्रयत्न व प्रयोग केलेले आहेत . असे गांधीजी ठामपणे म्हणत.
माणसाने स्वप्रयत्नाने कमावलेल्या विकसित अवस्थेतून अधोगतीकडे नेणारे षडरिपू( काम-क्रोध-मद-मोह-दंभ-मत्सर) हे शत्रू असतात. याविरुद्ध संघर्ष करून समाजाला ज्या प्रमाणात यश मिळेल त्याप्रमाणात समाजाचा खरा विकास झाला — असे असते. षडरिपू विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपली शास्त्रे-पुराणे खचाखच भरले आहेत.
याही शिवाय षड्रिपू विरुद्ध संघर्ष करण्यासाठी — आपल्या कठोर आचरणाने दीपस्तंभासारखे समाजाला मार्गदर्शन करणारे — संतांचे तर जणू काही उभे पीकच या भूमीत उगवत राहिले . सर्व जातीत उगवत राहिले . विशेष म्हणजे फार मोठ्या प्रमाणाने ब्राह्मणेतर जातींमधून ते निर्माण होत गेले.
सर्व संतांनी चामडी सोलल्यागत संसारात त्रास सहन केला पण — मूल्यांवर निर्धाराने कसे चालावे ; षडरिपूविरुद्धचा संघर्ष कसा पुढे न्यावा याचे समाजाला त्यांनी विश्वासाचे धडे दिले.
..अश्या आत्मविश्वासाच्या भक्कम आधारावर गांधीजी म्हणायचे की हिंदू धर्माकडे आणि भारताच्या भूमीकडे जगाला देण्यासारखे भरपूर आहे. जगाला या उपखंडातून शिकण्यासारखे भरपूर आहे. आणि म्हणूनच ब्रिटिश सत्तेविरूद्ध संघर्ष करताना राजकारणात शाश्वत मूल्यांना आपण फारकत घेऊ नये यासाठी त्यांची फार फार तळमळ असायची. राजकारणासाठी व समाजकारणासाठी त्यांनी मांडलेली सात पापे (seven sins) जगप्रसिद्ध आहेत.

*

अशा रीतीने सनातन मूल्यांवरील विकासाला हिंदू धर्म तर खूपच वाव देतोच पण जगातले सर्वच धर्मही वाव देतात . म्हणून गांधीजी म्हणायचे की धर्मांतर/कन्वर्जन ही नीती-मूल्यांपासून , नीति-तत्वापासून अंतर वाढवणारी बाब आहे आणि ते याच्या स्पष्टपणे विरोधात होते.
गांधीजींना ; त्यांच्या जवळच्या इतर धर्मीय अनुयायांपैकी क्वचित काहींनी ;
स्वतःला हिंदू धर्मात येण्यासाठी आग्रहाने विनंती केली. असे असतानाही गांधीजींनी त्यांच्यातील प्रत्येकाला ठाम विरोध केला व हिंदू धर्मात धर्मांतरित होण्यासाठी यशस्वीरीत्या परावृत्त केले . गांधीजी आग्रहाने म्हणायचे की जो जिथे जन्मला त्याने तेथेच श्रद्धेने आपल्या नीतीयुक्त आचरणाने आपापला धर्म उन्नत करावा , विकसित करावा .
कारण ग्रंथात , पुस्तकात धर्म कितीही श्रेष्ठ असू द्या . शेवटी इतर लोक तर कोणत्याही धर्माची पारख तेथील अनुयायांच्या वागणुकी वरूनच करणार. बहुतेक धर्मानुयायी जर अमानवीय वागत असतील , हिंसक वागत असतील , नीतिमानतेने वागत नसतील तर इतर लोक त्यांच्या वागण्यावरूनच त्यांच्या धर्माची पारख करणार . अशा धर्मातील पुस्तके ग्रंथ पुराण कितीही सर्वोच्च तत्त्वांची विचारांनी खचाखच भरलेले असतील तर काय फायदा ? इतर धर्मातील करोडो आणि अरबो लोक ते सर्वच्या सर्व वाचणार थोडेच आहेत ? कुठेही जा बहुसंख्य लोक आपल्याच स्वतःच्याच धर्मातले ग्रंथ तत्वे यांचे वाचन करीत नाहीत ; चिंतन करीत नाहीत. हे आपल्या सर्वांना स्पष्टपणे दिसत असते . मग इतरांचे कोण वाचत बसणार ! तेव्हा धर्माची मांडणी खऱ्या अर्थाने समाजाच्या आचरणामार्फत होत होत असते यात शंका नाही .
अशा परिस्थितीत कोणीही धर्मावलंबी आपल्या धर्मातच जर नीट वागत नसेल , बाह्य कारणे सांगत असेल तर तो इतरत्र जाऊन किंवा इतर धर्मातून माझ्या धर्मात येऊन कोणते दिवे लावणार आहे ? त्याच्या नवीन प्रवेशित धर्माला कोणता उजाळा देणार आहे ! उलट नवीन ठिकाणी तो नुकसान करण्याचीच जास्त शक्यता आहे . नेमके हे नुकसान आध्यात्मिक दृष्टीने असेल नीतिमत्तेच्या दृष्टीने असेल.
आज समाज आणि जग याचा अनुभव घेतच आहे. कन्व्हर्जन म्हणजे केवळ संख्याबळ वाढविणे आणि ताणतणावाला आमंत्रण याखेरीज दुसरे काही नाही . याची जाण गांधीजी करून देत असत .
म्हणूनच हिंदू धर्मात कन्वर्जन/धर्मांतर हा कन्सेप्टच नाही हे गांधीजी ठळकपणे दाखवून देत असत . व असा कन्सेप्ट नाही हे खरेही आहे.
धर्मांतर/कन्वर्जन असल्या बाबीऐवजी “सर्वधर्मसमभाव” हेच तत्त्व शाश्वत व सनातन असू शकते यामुळेच tolerance व सहिष्णुता असे गुण वाढीला लागतात जगात शांतीची समजदारीची विकास होऊ शकतो हेही आपण पाहत आहोत.

जगासाठी मानवासाठी हे असले विकासच खरे विकास आहेत ; महत्त्वाचे विकास आहेत.

सर्वधर्मसमभावा बद्दल गांधीजी जीवनभर फार आग्रही असत .

  • रमाकांत पाठक.

1) मंगल प्रभात
2)नीतिधर्म
3)धर्म नीती
4)माझा हिंदू धर्म नॅशनल बुक ट्रस्ट :
मराठी हिंदी इंग्रजी
तिन्ही भाषांत उपलब्ध

5)धर्मविचार भाग-1 | गांधी स्मारक
6)धर्मविचार भाग 2 | निधी पुणे

Leave a Reply